आईला रुग्णालयात नेताना कार पेटली , एकाच कुटुंबातील चौघांचा होरपळून मृत्यू

Foto
अजमेर : राजस्थानातील अजमेर जिल्ह्यात गुरुवारी पहाटे एक हृदयद्रावक दुर्घटना घडली. श्रीरामपुरा गावाजवळ धावत्या कारला अचानक आग लागल्याने एकाच कुटुंबातील चौघांचा जिवंत होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून गावकऱ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना बोराडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत पहाटे साडेपाचच्या सुमारास घडली. माजी सरपंच रामसिंह चौधरी हे त्यांच्या कुटुंबासोबत आई पूसी देवी यांना उपचारासाठी रुग्णालयात घेऊन जात होते. पूसी देवी यांच्या छातीत दुखत असल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्याचा निर्णय कुटुंबीयांनी घेतला होता. मात्र, रुग्णालय गाठण्यापूर्वीच काळाने त्यांच्यावर झडप घातली.

रस्त्यात असताना कारला अचानक आग लागली. आग इतक्या वेगाने पसरली की वाहनातील लोकांना बाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. काही क्षणांत संपूर्ण गाडी आगीच्या भक्ष्यस्थानी सापडली आणि आत अडकलेल्या चौघांचा जिवंत होरपळून मृत्यू झाला. या दुर्घटनेत माजी सरपंच रामसिंह चौधरी, त्यांची आई पूसी देवी, पत्नी सुरज्ञान देवी आणि भाची महिमा यांचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे सुरज्ञान देवी या जिल्हा परिषद सदस्या होत्या. त्यांच्या निधनामुळे राजकीय व सामाजिक क्षेत्रातही शोक व्यक्त करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनातील वरिष्ठ अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवले आहेत. दुर्घटनेनंतर घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. पोलीस अधीक्षक हर्षवर्धन अगरवाला यांनी प्राथमिक तपासात शॉर्ट सर्किट किंवा वाहनातील तांत्रिक बिघाडामुळे आग लागल्याची शक्यता व्यक्त केली आहे. नेमकं कारण शोधण्यासाठी फॉरेन्सिक टीमची मदत घेण्यात आली असून सखोल तपास सुरू आहे.